सीरियातील रासायनिक शस्त्रांची यादी करून त्यांची तपासणी करण्याच्या मोहिमेस बुधवारी प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी या कामी भाग घेतला आहे. सीरियातील शस्त्रे २०१४च्या मध्यापर्यंत नष्ट करण्याचे ठरले असून त्यानुसार ही यादी करण्यात येणार आहे.‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ या हेगस्थित संघटनेतील १९ जणांच्या तज्ज्ञ पथकाचे दमास्कस येथे आगमन झाले. सीरियातील रासायनिक शस्त्रे नष्ट करण्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने केलेल्या ठरावास अनुसरून ही पाहणी करण्यात येणार आहे.