पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा आधार घेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणीचाच आधार घेतला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी चौहान यांनी आकाशवाणीवरून आवाहन केले
आहे. शेतकऱ्यांनी शांत राहावे, आशा सोडू नये, धैर्य दाखवावे आणि समस्यांचा सामना करावा, असे चौहान म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सभागृहाची मान्यता गरजेची असून केवळ त्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आल्याची माहितीही चौहान यांनी दिली. आकाशवाणीवरून चौहान यांनी फोन-इन कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांशी बुधवारी संवाद साधला. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहील, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
यंदाचे वर्ष वाया गेले असले तरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार शक्य ती सर्व पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले. मदतीचे वितरण, पीक विम्याची रक्कम, बियाण्यांचा आणि खतांचा पुरवठा, शून्य व्याजदराने कर्ज आदी तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे ते म्हणाले.