नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून नोटाबंदी यशस्वी झाल्याच्या जाहिराती सुरु आहेत. तर काँग्रेससह विरोधकांकडून नोटाबंदी पूर्णपणे फसल्याची टीका सुरु आहे. याबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शायरीचा आधार घेऊन राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे.

‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. सोबतच राहुल गांधींनी एका वयोवृद्ध व्यक्तीचा फोटोदेखील ट्विट केला आहे. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना कसा फटका बसला, हे दाखवण्यासाठी राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे. मात्र राहुल गांधींनी ज्या वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो ट्विट केला आहे, ती व्यक्ती नोटाबंदीच्या निर्णयाने आनंदी असल्याचे समोर आले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधींनी ज्या वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो वापरला, त्या व्यक्तीशी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया वृद्ध व्यक्तीने दिली. या व्यक्तीचे नाव नंदलाल असून, ते लष्करातून निवृत्त झाले आहेत. नंदलाल गुरुग्राममध्ये एका भाड्याच्या घरात राहतात. ‘सरकारने घेतलेले निर्णय देशाच्या भल्यासाठीच असतात. त्यामुळेच माझा सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा आहे,’ असे नंदलाल यांनी म्हटले.

नंदलाल यांनी पत्रकारांशी बोलताना बँकेसमोरील रांगेत उभे राहण्याचे कारणदेखील सांगितले. ‘मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते. तर बँकेसमोरील रांगेत उभे असताना एका महिलेने पायावर पाय दिल्याने डोळ्यात पाणी आले होते,’ असे नंदलाल यांनी सांगितले. याआधीही राहुल गांधींनी नोटाबंदीच्या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. ‘नोटाबंदी एक आपत्ती आहे. पंतप्रधानांनी कोणताही विचार न करता घेतलेला हा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतला. तर अनेकांना यामुळे रोजगार गमवावा लागला. आम्ही अशा लोकांच्या सोबत आहोत,’ असे ट्विट राहुल यांनी केले होते.