करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना येत्या ३ मे रोजी तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे. आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्स फ्लाय पास्ट करणार आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचं कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात येतील. यामध्ये भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश असेल. समुद्रात भारतीय नौदलांकडूनही कोविड योद्ध्यांना सलामी देण्यात येईल.

यावेळी भारतीय युद्धजहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय इमारतींबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्डचे वादन होईल. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल.