14 December 2017

News Flash

इंदू मिल हस्तांतराची आज संसदेत घोषणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची १२.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाला

विशेष प्रतिनिधी,नवी दिल्ली | Updated: December 5, 2012 5:38 AM

आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची १२.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा उद्या संसदेत करण्यात येणार आहे. लोकसभेत वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा, तर राज्यसभेत संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला इंदू मिलची जागा केंद्राकडून महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्यात येत असल्याची घोषणा करतील.
या प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत होते. इंदू मिलच्या जागेचे हस्तांतरण करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करण्यासाठी  केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ाभरापासून यासंबंधीच्या घडामोडी निर्णायक टप्प्यात पोहोचल्या होत्या. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांची इंदू मिलच्या जागेसाठी आग्रही असलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या जागेच्या हस्तांतरणाची घोषणा येत्या गुरुवारी, ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी करण्यात येईल, हेही स्पष्ट करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी आनंद शर्मा यांची, तर सायंकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन इंदू मिलच्या हस्तांतरणाचा मार्ग प्रशस्त केला.     

First Published on December 5, 2012 5:38 am

Web Title: today announcement regarding indu mill transfer in parlament