बिहारमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा रविवारी निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार आहे. या वेळी राजकीय पक्ष आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशीही आयोगाचे सदस्य चर्चा करणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी आणि अन्य सदस्य अचलकुमार जोटी व ओमप्रकाश रावत हे रविवारी पाटणा आणि मुझफ्फरपूरला भेट देणार आहेत आणि तयारीचा आढावा घेणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान अनुक्रमे २८ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पाटणा येथे रविवारी आयोगाचे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय नाईक, पोलीस, अबकारी आणि प्राप्तिकर अधिकारी यांच्यासमवेत सदस्य निवडणूक खर्च व्यवस्थापनाचाही आढावा घेणार आहेत.