दिल्लीच्या करोलबाग भागात अर्पित पॅलेस हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी पहाटे घडली. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील आप सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याचे आदेश दिले आहेत.


चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त आम आदमी पक्षाकडून इंदिरा गांधी इंडोर स्टेडिअम येथे संगीतिक कार्यक्रमाचे जंगी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायक-संगीतकार विशाल ददलानी यांचा कॉनर्स्ट होणार होता. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीकरांना संबोधित करणार होते. यामध्ये चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती ते देणार होते.

आपचे समन्वय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली १४ फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्लीत सरकार स्थापन करण्यात आले होते. दिल्लीच्या जनतेने आपला खुल्या मनाने मतं दिली होती. ७० जागांच्या दिल्ली विधानसभेत ६७ जागा एकट्या आम आदमी पार्टीनेच पटकावल्या होत्या. हा विजय केजरीवाल यांच्यासाठी महत्वपूर्ण होता. कारण, ज्या भाजपाने २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीत ३२ जागा जिंकल्या होत्या त्या भाजपाला २०१५ मध्ये केवळ तीनच जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसचा दिल्लीत सुपडा साफ झाला होता.

दरम्यान, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, सरकारच्या उरलेल्या एक वर्षांच्या कार्यकाळात उर्वरित सर्व कामे पूर्ण केली जातील. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी संदेश दिला आहे की, कितीही अडचणी आल्या तरी आम्ही दिल्ली विकास थांबवणार नाही. जनतेसाठी आम्ही काम करतच राहू.