निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. तेलंगणमधील निवडणुकीच्या तारखाही आजच जाहीर होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागच्या पंधरा वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा सामना करावा लागणार आहे. २०१३ मध्ये केंद्रातल्या मनमोहन सिंग सरकार विरोधात नाराजी होती. त्यावेळी मोदी लाटेचीही सुरुवात झाली होती. त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता टिकवणे कठिण गेले नाही.

पण आता केंद्रात भाजपाचे सरकार असून राफेल विमानाच्या खरेदी व्यवहारावरुन या सरकारवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा सरकार आणण्याचे भाजपासमोर कठिण आव्हान आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्यात अचारसंहिता लागू होईल.