भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. आज भारतमातेने आपला सुपुत्र गमावला आहे अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर जनतेने अतोनात प्रेम केले. तसेच त्यांचा आदरही राखला, अशा नेत्याचे आपल्यातून जाणे हे निश्चितच क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, देशाला कायमच एका चांगल्या नेत्याची उणीव भासेल यात मला काहीही शंका वाटत नाही असेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज एम्स रूग्णालयात निधन झाले. साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहे. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.