भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे राजकीय भवितव्य उत्तर प्रदेशातील मतदारांनी सोमवारी मतदानयंत्रात बंद केले आणि गेल्या दोन महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपुष्टात आले. आता सर्वांचे लक्ष निकालांकडे असून येत्या शुक्रवारी देशात खरंच ‘मोदी सरकार’ येणार की फुगा फुटणार हे स्पष्ट होईल.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या वाराणसी मतदारसंघामध्ये सोमवारी शेवटच्या टप्प्यात मतदान झाले. वाराणसीतील मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी केंद्राबाहेर गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. दुपारी तीन वाजेपर्यंत वाराणसी मतदारसंघामध्ये ४४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. २००९ मध्ये याच मतदारसंघात एकूण ४२ टक्के मतदान झाले होते. पश्चिम बंगालमधील १७ जागांसाठी दुपार तीन वाजेपर्यंत तब्बल ६७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. बिहारमधील सहा जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले होते. उत्तर प्रदेशातील इतर मतदारसंघातही मतदारांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळाला.
अजय राय यांच्याविरुद्ध गुन्हा
वाराणसीतील कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मतदानाला जाताना आपल्या कुर्त्यावर पंजाचे निशाण लावल्यामुळे निवडणूक आयोगाने याप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला आहे. राय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपचे खासदार मुरली मनोहर जोशी यांनी हा फार मोठा मुद्दा नसल्याचे म्हटले आहे. प्रत्येकजण मतदान केंद्रात स्वतःचा हात घेऊन जातो. मग तो हातही कापायचा का, असा सवाल मुरली मनोहर जोशी यांनी विचारला आहे. प्रचंड मताधिक्याने जिंकून येणाऱया पक्षाने छोट्या गोष्टींचा फार विचार करायचा नसतो, असेही ते म्हणाले. मतदानादिवशी कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला प्रचार करण्यात हक्क नसतानाही अजय राय यांनी पंजाचे निशाण लावल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याआधी वडोदरामध्ये नरेंद्र मोदी यांनीही मतदानाला जाताना आपल्या जॅकेटवर कमळाचे निशाण लावले होते. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती आणि निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पश्चिम बंगालमध्ये तुंबळ हाणामारी
पश्चिम बंगालमध्ये उत्तर २४ परगणा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडल्यामुळे १३ जण जखमी झाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली आणि एकमेकांवर लाठीमारही केल्याचे पोलीसांनी सांगितले.

मतदानाची सरासरी टक्केवारी-
उत्तरप्रदेश- ५५.२९ %
बिहार- ५७ %
पश्चिम बंगाल- ७९.३ %