राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. भाजपाचा आणखी एक संकल्प पूर्ण झाला आहे. मात्र या निर्णयावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ” आज भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस पाहण्यास मिळाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मिळालेली मंजुरी म्हणजे कोत्या मनोवृत्तीच्या आणि धर्मांध शक्तीच्या लोकांचा विजय आहे” अशी खरमरित टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही या संदर्भात भाजपावर निशाणा साधला आहे. दरम्यान चिदंबरम यांनी शिवसेनेचं कौतुक केलं आहे. शिवसेनेने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातला ही चांगली बाब आहे असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेत या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली. या चर्चेमध्ये विरोधकांनी काही सूचनाही दिल्या होत्या. या १४ सूचनांवरही मतदान घेण्यात आलं. मात्र या सगळ्या सूचनांपैकी बहुतांश सूचना फेटाळण्यात आल्या. भाजपा नेत्यांनी हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर काँग्रेस नेत्यांनी आणि इतर विरोधकांनी या निर्णयावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.