15 July 2020

News Flash

अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध; चीनच्या हातची बाहुली असल्याचा ट्रम्प यांचा आरोप

निधीचा वापर इतर आरोग्य संघटनांसाठी करणार, ट्रम्प यांची माहिती

सध्या जगभरातल करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. तर दुसरीकडे या संकटाला चीन जबाबदार असल्याचं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल केला होता. त्यातच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी संघटनेसोबत सर्व संबंध तोडण्याचाही इशारा दिला होता. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

“जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे,” असं ट्रम्प म्हणाले. “सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचं वर्चस्व आहे, त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत केली जात होती. परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत,” असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चीनच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली.

वुहान व्हायरसमुळे १ लाख जणांचा मृत्यू

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा या व्हायरसला वुहान व्हायरस असं संबोधलं. “चीननं वुहान व्हायरसची माहिती लपवल्यामुळेच तो जगभरात पसरला. या व्हायरसमुळेच अमेरिकेतील १ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्य़ू झाला. तर जगभरातही लाखो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे,” असं ट्रम्प म्हणाले.

थांबवला होता WHO चा निधी

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता. जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समिक्षा केली जात नाही तोवर हा निधी थांबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. तसंच त्यांनी जागति आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 7:43 am

Web Title: today we will be terminating our relationship with who america president donald trump jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 बापरे… ‘तो’ एकावेळी खातो ४० पोळ्या आणि दहा प्लेट भात; क्वारंटाइन केंद्रावर अन्नधान्याचा तुटवडा
2 लडाखच्या मुद्दय़ावर ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्याचा भारताकडून इन्कार
3 अर्थबुडी?
Just Now!
X