ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा आज (शनिवार) शाही विवाह मोठ्या थाटात पार पडणार आहे. विंडसर कासल येथील सेंट चार्ज चॅपल चर्चमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाहादरम्यान, प्रिन्स चार्ल्स मेगन यांच्या वडिलांची जबाबदारी घेत मेगनला चर्चपर्यंत घेऊन येतील. यापूर्वीच चार्ल्स यांनी मेगनला सांगितले होते की, आपण तिच्या वडिलांची जबाबदारी निभावणार आहोत. कारण, मेगनचे वडिल थॉमस मार्केल हे आजारी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर ह्रदयासंबंधीच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, प्राणी हक्कांसाठी लढणारी स्वयंसेवी संस्था ‘पेटा’ या नवजोडप्याला एक बैलाचे चित्र भेट देण्यात येणार आहे. मेरी असे या बैलाच नाव असून हे नाव मेगन आणि हॅरी या नावांवरून ठेवण्यात येणार आहे.

या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला विशेष निमंत्रण देण्यात आले असून प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सही या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहे. या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. यासाठी एक लाखांहून अधिक लोक विंडसर कासलमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिस, गुप्तचर अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर शाही जोडीला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विवाह समारंभादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास थेट गोळ्या घालण्याचे आदेशही सुरक्षा रक्षकांना देण्यात आले आहेत.

मेगनने लग्नासाठी आपल्या कुटुंबाला निमंत्रण दिलेले नाही. मात्र, तरीही त्याच्या कुटुंबियांनी अमेरिकेतून ब्रिटनकडे विवाह समारंभाला हजेरी लावण्यासाठी उड्डाण केले आहे. माध्यमांनी यापूर्वीही सांगितले होते की, मेगनचे वडिल या विवाहाला हजर राहणार नाहीत कारण वडिल-मुलीमध्ये पटत नाही.

मेगन घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला होता.

प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचे असून मेगन ३६ वर्षांची आहे. नववधूचा विवाहासाठी खास तयार करण्यात आलेल्या वेडिंग ड्रेसची किंमत ३० लाख युरो इतकी आहे. या शाही विवाहाला ६०० विशेष पाहुणे हजेरी लावणार आहेत. तर २०० लोकांना रात्रीच्या रिसेप्शनसाठी बोलावण्यात आले आहे. त्याचबरोबर १२०० सर्वसामान्य लोकांनाही या विवाहासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या विवाहासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.