प्रत्येक दिवसाचे महत्व जाणून गुगल आपले विशिष्ट असे डूडल तयार करत असतो. गुगलने काल (३० एप्रिल) देखील भारतीयांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे डूडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली होती. तसेच आजही गुगलने असेच काहीसे केले आहे.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिनानिमित्त डूडलने मजूर, कामगार आणि श्रम करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित असे डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये मजुरांच्या वापरात येणाऱ्या साहित्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. तर ‘लेबर डे २०१८’ असे समर्पक शीर्षकही देण्यात आले आहे.

आजच्याच दिवशी अमेरिकेमध्ये मजदूर संघाने एक महत्वाचा निर्णय घेत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान शिकागोमधील हेमार्केट येथे बॉम्बस्फोट होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारीमध्ये काही मजुरांचा मृत्यू झाला. या मजुरांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी १ मे ‘आंतरराष्ट्रीय मजदूर दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

तसेच कोणताही कामगार आठ तासांपेक्षा अधिक तास काम करणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. आजच्या दिवशी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय रजेचा दिवस म्हणून पाळला जातो.

दरम्यान, १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. आजचा दिवस महाराष्ट्र राज्याची निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे आजच्या दिवशी राज्यात सार्वजनिक रजा असते. तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी अनेकांनी बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांचे आजच्या दिवशी स्मरण केले जाते.