राजस्थानमधल्या श्री गंगानगर या ठिकाणी आज उन्हाचा पारा ४९.६ अंश सेल्सिअस एवढा प्रचंड नोंदवला गेला. देशातला सर्वात तप्त दिवस या ठिकाणी नोंदवला गेला अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रचंड पारा वाढला आहे. महाराष्ट्रातही नागपूर, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेला पाहण्यास मिळाला. उष्मा वाढल्याने लोकांना उकाड्याचा प्रचंड त्रासही सहन करावा लागतो आहे. अशात आता देशभरातले सर्वाधिक तापमान हे राजस्थानतल्या श्री गंगानगर या ठिकाणी नोंदवले गेले. उन्हाचा पारा ४९.६ अंशांवर नोंदवला गेला.

मार्च महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला होता. विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह राज्यभरात कडक उन्हाळा होता यात काहीही शंका नाही. त्याचप्रमाणे देशातही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले. जून महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. आजच हवामान खात्याने भारतात यावर्षी सरासरी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण हे प्रदीर्घ काळासाठी सरासरी ९६ टक्के राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. एकीकडे उन्हामुळे चटके बसत असताना ही काहीशी आल्हाददायक बातमी आहे. दरम्यान आज सर्वाधिक तापमानाची नोंद ही राजस्थानातल्या श्री गंगानगर येथे झाली आहे