उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या एका पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. खेळताना एका चिमुकल्याचं प्रेशर कुकरमध्ये अडकलेलं डोकं बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. मात्र, यासाठी डॉक्टरांना एका मेकॅनिकची मदत घ्यावी लागली. हा मेकॅनिक ग्राइंडर मशीनने भांड कापून डॉक्तरांच्या पथकाला मदत करत होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दीड वर्षाचा मुलगा शनिवारी (ऑगस्ट २८) शहरातील त्याच्या मामाच्या घरी खेळत असताना त्याच डोकं कुकरमध्ये अडकलं.

कुटुंबातील सदस्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर पहिल्यांदा त्या चिमुकल्याचं डोकं बाहेर काढण्यासाठी घरातच प्रयत्न केले. परंतु, ते प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर ते आपल्या मुलाला एसएम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉ. फरहत खान आणि त्यांच्या टीमला दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाची त्रासातून सुटका करण्यात आणि त्याला वाचवण्यात मोठं यश आलं. “सर्व सुरक्षा निकषांचे पालन करून तो कुकर ग्राइंडरच्या मदतीने कापला आणि आम्ही मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी झालो”, असं डॉ. फरहत खान म्हणाले होते.

आपल्या मुलाला वाचवल्याबद्दल कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले. यावेळी कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं कि, “आम्ही डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आमच्या मुलाला वाचवण्यात यश आलं.”