News Flash

उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची मात्र आईला उठवण्यासाठी केविलवाणी धडपड

रेल्वे स्थानकावरावरील हृदयद्रावक व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना अनेक संकटांचा समाना करावा लागत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील एका रेल्वे स्थानकावरील आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा प्लॅटफॉर्मवर पडलेल्या आपल्या आईच्या मृतदेहावरील चादर खेचून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या घटनेसंदर्भात हळहळ व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पडल्याचे दिसून येत आहे. या मृतदेहावरील चादर खेचून या महिलेचा लहान मुलगा तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा तिच्या अंगावर चादर खेचून काढतो मात्र त्या महिलेकडून काहीच प्रतिसाद त्याला मिळत नाही. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांनी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू उपासमारीमुळे झाला आहे. भूकेबरोबरच प्रचंड उष्णता आणि शरिरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रेल्वे स्थानकातच या महिलेने प्राण सोडल्याचे कुटुंबिय सांगतात.

हा सर्व धक्कादायक प्रकार बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मरण पावलेली २३ वर्षीय महिला ही श्रमिक विशेष ट्रेनने सोमवारी (२५ मे) बिहारमध्ये दाखल झाली होती. याच स्थानकावर अन्य एका घटनेत एका लहान मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने आणि उष्णतेच्या त्रासामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत मुलाचे कुटुंबिय रविवारी दिल्लीवरून रवाना झालेल्या ट्रेनने बिहारमध्ये दाखल झालं होतं.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी २३ वर्षीय महिलेने शनिवारी (२३ मे रोजी) गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष ट्रेन पकडली होती. मात्र प्रवासादरम्यान पुरेश्या प्रमाणात पाणी आणि अन्न न मिळाल्याने या महिलेला बरं वाटतं नव्हतं. अखेर रेल्वे मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर खाली उतरल्यावर या महिलेला चक्क आली आणि ती खाली पडली. काही जणांनी या महिलेला प्लॅटफॉर्मवरील एका ब्रिजखाली ठेवले तिथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे लहान मुल तिच्या अंगावरील चादर खेचून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्याच्या मोठ्या भावाने त्याला आईपासून दूर केलं.

ही महिला ट्रेनमध्ये बसली तेव्हाच तिला बरं वाटतं नव्हतं. या महिलेचा मृत्यू झाल्याने तिचे कुटुंबिय मुज्जफरापूर रेल्वे स्थानकामध्ये उतरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. “ही महिला आधीपासूनच आजारी होती असं तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. २३ मे रोजी अहमदाबादवरुन कटिहारला जाण्यासाठी त्यांनी ट्रेन पकडली होती. २५ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबिय मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात उतरले. चुकीची माहित पसरवू नका असं आवाहन करतो,” असे ट्विट रेल्वेच्या प्रवक्त्यांनी केलं आहे.

२५ मार्चपासून देशभरामध्ये सुरु असणाऱ्या लॉकडाउनमुळे देशभरातील मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकजण हातचं काम गेल्याने शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करुन आपल्या मूळ राज्यात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान झालेल्या काही अपघांमध्ये स्थलांतरित मजुरांचे प्राण गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या सुरू झालेल्या आणि अजूनही होत असलेल्या हालअपेष्टांची स्वाधिकारात (सुओ मोटो) दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांकडे उपायांबाबत विचारणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 8:44 am

Web Title: toddler tries to wake mother who died of hunger heat in bihar scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उष्णतेची लाट आणखी २४ तास
2 ‘काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी’
3 करोना महासाथ २०२१ पर्यंत राहणार!
Just Now!
X