Advertisement

Tokyo 2020: “मिराबाई तुम्ही यापुढे तिकीट तपासण्याचं काम करायचं नाही,” मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मिराबाई चानू यांच्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात उचलले. दरम्यान मिराबाई चानू यांच्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

एका जिद्दीची कहाणी!

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी मिराबाई चानूला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या मिराबाई चानू भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस (टीसी) म्हणून काम करत आहे. एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानू रौप्यपदक घेऊन घरी परतल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

मिराबाईची रौप्यक्रांती!

“तू यापुढे रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही,” असं मुख्यमंत्री मिराबाई चानूला व्हिडीओत सांगत आहेत. “मी तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट राखीव ठेवत आहेत,” असंही आश्वासन यावेळी त्यांनी दिलं असून माहिती मात्र गुपित ठेवली.

मिराबाईची वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडावी, म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते. शनिवारी ऑलिम्पिकमध्ये रुपेरी यश मिळवताना मिराबाईच्या आईचे पाठबळ सहज लक्ष वेधत होती. आईने भेट म्हणून दिलेले ऑलिम्पिकच्या पंचवर्तुळांचे कानातले तिने या वेळी परीधान केले होते. त्यामुळे आई सैखोम ओंगबी टोंबी लेईमाला आपले अश्रू आवरणे कठीण गेले. ‘‘२०१६च्या रिओ ऑलिम्पिकआधी हे कानातले मी मिराबाईला दिले होते. तिला यश मिळावे यासाठी मी ते सोन्याचे बनवले होते. तिने मिळवलेले पदक पाहताना मी आणि माझे पती आनंदाश्रूंत न्हाऊन गेलो. मेहनतीचे चीज झाले,’’ अशी प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली.

चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.

“माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेली पाच वर्ष हे स्वप्न मी जोपासले होते. आज माझा मला अतिशय अभिमान वाटतो. मी सुवर्णपदकाच्या ईष्र्येनेच खेळले. परंतु रौप्यपदकसुद्धा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे यश आहे. ऑलिम्पिकमधील भारतासाठी यंदाचे पहिले पदक मिळवल्याबद्दल मी आनंदित आहे. मी फक्त मणिपूरची नाही, तर संपूर्ण देशाची आहे. मी माझे प्रशिक्षक विजय शर्मा आणि अन्य साहाय्यक मार्गदर्शकांची आभारी आहे. त्यांच्या अथक मेहनत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवता आले. मी माझे कुटुंब, विशेषत: आईची आभारी आहे. माझ्या कारकीर्दीतील या सर्वोच्च यशासाठी तिने फार मेहनत घेतली आहे,” अशी भावना मिराबाई चानूने व्यक्त केली आहे.

20
READ IN APP
X
X