यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिक २०२०मध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मग ते बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूनं मिळवलेलं मेडल असो किंवा मग भारतीय महिला हॉकी संघानं टोक्योमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत घडवलेला इतिहास असो. पण एकीकडे आख्खा भारत भारतीय खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी मात्र भारताच्या पदकसंख्येवर आणि कामगिरीवर टीका केली आहे. तसेच, भारताच्या तुलनेत कतारसारख्या लहान देशानंही चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटिझन्सनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

 

“भारतानं फक्त १ रौप्य आणि एक कांस्य…”

मार्कंडेय काटजूंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची तुलना चीन आणि कतारशी केली आहे. “भारताइतकीच लोकसंख्या असलेल्या चीननं आत्तापर्यंत ३२ सुवर्णपदकं, २० रौप्य पदकं आणि १६ कांस्य पदकं जिंकली आहेत. भारतानं फक्त १ रौप्य पदक आणि १ कांस्य पदक जिंकलं आहे. अगदी कतार (२ सुवर्ण) आणि फिजी (१ सुवर्ण, १ कांस्य) सारख्या छोट्या देशांनीही भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आणि तरीही आपण आनंद मानायला हवा की पाकिस्ताननं अद्याप काहीही जिंकलेलं नाही”, असं मार्कंडेय काटजू यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मार्कंडेय काटजूंनी ही टीका केल्यानंतर त्यांच्या ट्वीटचा नेटिझन्सकडून समाचार घेण्यात येतो आहे.

 

एगेलिटेरियन नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून काटजूंच्या ट्वीटवर निशाणा साधण्यात आला आहे. “एसी केबिनमध्ये बसून टीका करणं सोपं आहे. तुम्ही कधी या खेळाडूंना कोणत्या परिस्थितीत प्रशिक्षण घ्यावं लागतं हे पाहिलं आहे का? सरकारने जाहीर केलेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही हे तुम्हाला माहितीये का?”, असे सवाल या ट्वीटमध्ये विचारण्यात आले आहेत.

 

दरम्यान, शैलेंद्र मिश्रा नामक अकाउंटवरून भारताची पाकिस्तानसोबत तुलना करण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. “मार्कंडेय काटजू यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुणीही आपल्या ऑलिम्पिक टीमची तुलना पाकिस्तानसोबत केल्याचं ऐकिवात नाही. शिवाय, अजूनही ऑलिम्पिक सुरू आहे. आणि पाकिस्तानसोबतच तुलना का करावी? बर्मा, नेपाळ, भूटान, श्रीलंका या देशांसोबत तुलना का नाही?”, असा सवाल या ट्वीटमध्ये विचारण्यात आला आहे.