भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने सरकारी तेल कंपन्यांवर खळबळजनक आरोप केला आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून 2019 च्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने केला आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

2019 च्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा आणि जर फोटो लावण्यास नकार दिलात तर पेट्रोल पुरवठाच बंद करू अशी धमकी देण्यात आल्याचा दावा भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेचे अध्यक्ष एसएस गोगी यांनी केला आहे. इंडियन ऑईल कॉर्पौरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पौरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पौरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून दबाव आणला जात असल्याचं गोगी म्हणाले. याशिवाय, केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना देऊ केलेल्या एलपीजी कनेक्शनच्या योजनेचे डिस्पलेही पेट्रोल पंपावर लावण्याच्या सुचना सरकारी तेल कंपन्यांकडून देण्यात आल्याचा आरोप गोगी यांनी केला आहे.

देशभरातील पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांची खासगी माहितीही सरकारने मागवली असून यामध्ये त्या कर्मचाऱ्यांची जात, धर्म, आणि ते कुठल्या मतदार संघात येतात याबदद्ल विचारणा करण्यात आली आहे, असा गंभीर आरोपही गोगी यांनी केला आहे. हे व्यक्तीगत अधिकारांचं उल्लंघन असून आम्ही या दबावाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी करत असल्याचं गोगी यांनी सांगितलं.
यापूर्वी, जून महिन्यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पौरेशन या कंपन्यांनी देशातील 59,000 पेट्रोलियम डिलर्सला पत्र पाठवून त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती द्यावयास सांगितले होते, यामागे पंतप्रधान स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण योजनेसाठी त्यांची ओळख पटवणं सोपं होईल असं कारण सांगण्यात आलं होतं, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान, माहिती देण्यास नकार दिला तर पेट्रोल पुरवठा बंद करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली होती असं म्हटलं आहे.