पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर असणाऱ्या कराचीमधील बाजारपेठांमध्ये टोमॅटोच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली. मंगळवारी येथे एक किलो टोमॅटोची किंमत चक्क ४०० रुपये इतकी होती. पाकिस्तानने शेतमालाच्या आयातीवर बंदी घातल्याने ही दरवाढ झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवल्यापासून पाकिस्तानने भारतामधून आयात होणाऱ्या शेतमालावर बंदी घातली आहे. तेव्हापासूनच तेथील टोमॅटोच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने इराणमधून ४ हजार ५०० टन टोमॅटो आयात करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र याचा बाजारातील टोमॅटोचा तुटवडा दूर होण्यासाठी उपयोग झाला नाही आणि टोमॅटोच्या किंमतीचा आलेख चढताच आहे.

डॉनच्या वृत्तानुसार एका व्यापाऱ्याने संपूर्ण ४ हजार ५०० टन टोमॅटो पाकिस्तान आलेच नसल्याचा दावा केला आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आयत करण्यासाठी परवानगी दिली मात्र केवळ ९८९ टन टोमॅटो पाकिस्तानमध्ये आल्याचे या व्यापाऱ्याने म्हटलं आहे. मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमधील टोमॅटोच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढच होताना दिसत आहे. भारतातून आयात करण्यास पाकिस्तानने बंदी घातली तेव्हा तेथील टोमॅटोचे दर हे ८० ते १०० रुपये किलो इतकी होते. मात्र मागील काही आठवड्यांमध्ये हा दर ३०० रुपये प्रति किलोच्या घरात होता. बुधवारी टोमॅटोच्या किंमतीने ४०० रुपये प्रति किलोचा पल्ला गाठला. पाकिस्तानमध्ये यंदा टोमॅटोचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने टोमॅटोचे दर वाढत असतानाच पाकिस्तानने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा भूर्दंड सामान्यांना पडत आहे.

“सध्या आम्ही इराण आणि पाकिस्तानमधील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो विकत आहोत मात्र पुरवठा अपुरा आहे. त्यामुळेच दर प्रचंड वाढले आहेत,” असं एका व्यापाऱ्याने सांगितलं आहे. पाकिस्तानी सरकारचे आयात विषयक धोरण या दरवाढीला जबाबदार असल्याचे डॉनने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. मुक्त बाजारपेठेमध्ये टोमॅटोच्या आयातीला सरसकट परवानगी न देता सरकारने मोजक्या व्यापाऱ्यांना ही परवानगी दिल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काही व्यापाऱ्यांनी टोमॅटोचा कृत्रिम साठा करुन ते अधिक किंमतीला विकल्याचे छोट्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomato price hits rs 400 per kilogram mark in pakistan scsg
First published on: 21-11-2019 at 13:52 IST