फ्रान्समधील डॅसॉल्ट कंपनीकडून लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी प्रस्तावित करारात गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता गृहीत धरून तपास करणे, हे खूप घाईचे ठरेल, असे मत संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी मंगळवारी व्यक्त केले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीकडून १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी लाचखोरी झाल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासातून स्पष्ट झाले. त्यानंतर पत्रकारांनी डॅसॉल्ट कंपनीच्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी कराराबद्दल विचारल्यावर ऍंटनी यांनी हे उत्तर दिले.
लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर ऑगस्टावेस्टलॅंडबरोबरचा सुमारे ७५० दशलक्ष डॉलरचा करार रद्द करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जगातील संरक्षणविषयक मोठ्या करारांमध्ये गणना होऊ शकेल, अशा राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीबद्दल ऍंटनी यांनी सरकारची भूमिका मांडली.
ते म्हणाले, डॅसॉल्ट कंपनी आणि भारतामधील प्रस्तावित करारात गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता गृहीत धरून तपास करणे, हे खूप घाईचे होईल. कोणताही संरक्षणविषयक करार होताना विविध पातळ्यांवर त्याची छाननी होत असते आणि करारमध्ये पारदर्शकता ठेवण्याशी कधीही तडजोड केली जात नाही. या करारामध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आले, तरी आम्ही कोणाचीही हयगय करणार नाही. डॅसॉल्ट कंपनीकडून १२६ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी करार करण्यात येणार आहे. हा करार दहा अब्ज डॉलरचा असणार आहे.