टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांना पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीची एक दिवसाची कोठडी मिळाली आहे. दिशा रवीची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांना ही कोठडी मिळाली आहे. दिल्ली पोलिसांना सह आरोपीसोबत दिशाची चौकशी करता येईल. टूलकिट प्रकरणात दिशा रवी एक आरोपी आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी दिशाची वाढवून दिलेली न्यायालयीन कोठडी संपणार होती. म्हणून तिला दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
टूलकिट प्रकरणात २२ वर्षाच्या दिशा रवीला शुक्रवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरुमधील राहत्या घरातून दिल्ली पोलिसांनी तिला अटक केली. शनिवारी न्यायालयाने दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, उद्या मंगळवारी न्यायालय निर्णय देणार आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेले शांतनू मुळूक आणि निकिता जेकब यांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे.
दिशा रवीने ते टूलकिट पर्यावरणासाठीच कार्य करणाऱ्या ग्रेटा थनबर्गला टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून पाठवलं व ते ग्रेटाने शेअर करावे, यासाठी प्रयत्न केले असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. दिशा रवी ‘टूलकिट गुगल डॉक’ची संपादक असून ते बनवण्याच्या कटात सहभागी असल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 5:51 pm