पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणाचे धागेरदोरे महाराष्ट्र आणि बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या निकीता जेकब आणि बीडमधील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. याप्रकरणी दोघांचीही आज दिल्ली पोलिसांनी चौकशी केली.

बंगळुरूतील दिशा रवीनंतर मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही टूलकिट प्रकरणात सहभाग असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलेला आहे. याप्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झाडाझडतीही घेतली होती. तसेच दिल्लीतील न्यायालयाने शंतनू विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. दरम्यान, शंतनूला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने अंतरिम जामीन दिलेला असून, शंतनूने पोलिसांना चौकशी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यानुसार आज शंतनूची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शंतनूची चौकशी केली. द्वारका येथील पोलिसांच्या कार्यालयात शंतनूची चौकशी करण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. निकीता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्यावर असलेल्या आरोपांप्रकरणी आज चौकशी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

शंतनू यांच्याबरोबरच निकीता यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. त्याबरोबर अंतरिम जामीनाच्या काळात त्यांना अटक करण्यात आल्यास त्यांची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने आदेशात म्हटलेलं आहे.

शंतनू मुळूक कोण?

शेतकरी आणि पर्यावरणाविषयी शंतनू संवेदनशील आहे. शंतनू हे राष्ट्रीय स्तरावर पर्यावरणासाठी काम करतात. शंतनू हे औरंगाबाद शहरात कामाला आहेत. काही कामानिमित्ताने ते पुण्याला गेले होते. त्यानंतर कुटुंबियांशी त्यांचा कोणताही संपर्क झालेला नव्हता. याचं काळात दिल्ली पोलिसांनी शंतनूविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई केली होती. पोलिसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेत कुटुंबीयांकडेही त्यांची चौकशी केली होती.