केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भगव्या दहशतवादाच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जंतर-मंतरवर जमलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनाही ताब्यात घेण्यात आले.
शिंदे यांच्या वक्तव्यामुळे देशात निषेधाची लाट उसळली असल्याचे सांगून पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, शिंदे यांच्या वक्तव्याचे पाकिस्तानने स्वागत केले आहे. त्यांना बरे वाटण्यासाठीच शिंदे यांनी भगव्या दहशतवादाबद्दलचे वक्तव्य केले. भारतावर टीका करण्यासाठी शिंदे यांनी पाकिस्तानला संधी उपलब्ध करून दिली आहे. भारत हा दहशतवादाचा अड्डा असून, पाकिस्तानात जे काही घडते आहे ते भारतीय दहशतवाद्यांमुळेच, असेही पाकिस्तानातील नेते उद्या शिंदे यांच्या वक्तव्यामुळे म्हणू शकतात. भारताच्या गेल्या ६५ वर्षांच्या इतिहासात कोणीही दहशतवादाचा संबंध धर्माशी जोडला नाही. पण, शिंदे यांनी तो जोडला.
कॉंग्रेस केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी भाजपवर टीका करीत असल्याचा आरोपही जावडेकर यांनी केला. शिंदे यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हजारो कार्यकर्ते बुधवारी जंतर-मंतरवर जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनीही तिथे मोठा बंदोबस्त ठेवला होता.