केंद्र सरकारच्या ३०० उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी योग्यपद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्यासंदर्भातील एका कार्यशाळेला नुकतीच हजेरी लावली. माय गव्हरमेंट या सरकारी उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अभिषेक सिंह यांनी ही कार्यशाळा घेतली. लोकांच्या तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या माय जीओव्ही या उपक्रमाचे प्रमुख असणाऱ्या सिंह यांनी या कार्यशाळेमध्ये लोकांसमोर ‘सरकारची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे’ आणि ‘सकारात्मक गोष्टी तसेच सरकारच्या चांगल्या कामांच्या माध्यमातून सरकारबद्दल सकारात्मक मतप्रवाह निर्माण करणे’ यासंदर्भात मार्गदर्शन केलं. सरकार निर्णय घेण्याबद्दल संवेदनशील, तत्पर, तातडीने प्रतिसाद देणारी आणि खूप काम करणारी असल्याचं चित्र निर्माण करण्यासंदर्भात मार्गदर्शन या कार्यक्रमातील प्रेझेंटेशनमधून करण्यात आल्याचं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर पालक त्यांच्यासोबत रुग्णालयात राहणार की…; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

९० मिनिटांच्या या व्हर्च्यूअल कार्यशाळेमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी झाले होते. त्यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना संबोधित केलं. देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. केंद्र सरकार देशातील करोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याची टिका सर्वच स्तरातून होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आय़ोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांनी या कार्यशाळेला हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. सकारात्मक बातम्यांवर आपण लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असं यावेळी जावडेकरांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं समजतं. अशाप्रकारे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच सरकारच्या इमेज बिल्डींगसाठी अशी कार्यशाळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> “लोकांनी आम्हाला दोन वेळा निवडून दिलंय, आम्हाला त्यांची काळजी आहे”; मोदी सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

यासंदर्भात कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिलाय. सिंह यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. करोना कालावधीमध्ये सकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात सांगण्याबरोबरच एका स्लाइडमध्ये माय जीओव्ही आणि सरकारने कृषी कायद्यांबद्दल कशाप्रकारे सकारात्मक मत निर्माण केलं याबद्दल भाष्य करण्यात आलेलं.

नक्की वाचा >> “तुम्ही निवडणूक लढवणार आहात, आम्ही नाही; जनतेला उत्तर देण्यास तुम्ही बांधील आहात”; न्यायालयाने केंद्राला फटकारलं

प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी असणाऱ्या वेगवेगळ्या सरकारी माध्यमांच्या उपसचिवांनी या कार्यशाळेला हजेरी लावल्याचा खुलासा या कार्यशाळेत उपस्थित राहिलेल्या एका अधिकाऱ्याने केलाय. केवळ प्रसिद्धी पत्रकं काढून काहीही होत नसून सकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली. प्रसिद्धीपत्रक पोस्ट करण्याऐवजी जास्त इम्प्रेशन (जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतील असे) फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्याचा सल्ला कार्यशाळेत माध्यम उपसचिवांना देण्यात आला.

सध्याच्या काळामध्ये आलेल्या माहितीसंदर्भात थोडा जरी उशीर केला तरी प्रसारमाध्यमे त्याची बातमी करुन संपूर्ण गोष्टींला वेगळ्याच दृष्टीकोनातून मांडू शकतात, असं प्रेझेंटेशनमध्ये सांगण्यात आलेलं. तुमच्याकडे मंत्रालय आणि मंत्र्यासंदर्भातील माहिती सर्वात आधी येत असल्याने ती सकारात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहचेल यामध्ये तुमची भूमिका फार महत्वाची ठरते, असं अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं.

नक्की वाचा >> “लोक श्वास घेता येत नसल्याने मरतायत अन् दुसरीकडे अहंकारी मोदींनी नव्या संसदेचं बांधकाम सुरु ठेवलंय”

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने लस घेण्याच्या तयारीत असलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींचा शोध घेण्यास सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तींच्या माध्यमातून लसीकरणासंदर्भातील सकारात्मक दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहचवता येईल असं सांगण्यात आलं. मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर लसीकरणासंदर्भातील चर्चा सर्वाधिक होती असंही सांगण्यात आलं. सोशल मीडियावर चांगल्या आणि वाईट पद्धतीने माहिती कशी फिरवली जाते, त्याला प्रतिसाद कसा मिळतो, माहिती कशी वापरावी यासंदर्भातील मार्गर्शन करण्यात आलं. मागील काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे अपयश मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र दिसत आहे. फोटो, व्हिडीओ, माहिती आणि हॅशटॅगच्या माध्यमातून करोना परिस्थितीवर अनेकजण भाष्य करताना दिसत आहेत.