मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना म्यानमारच्या हद्दीत शिरून ठार मारणाऱ्या २१ पॅरा रेजिमेंटच्या ८ जवानांचा राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळवणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
या वर्षीच्या सुरुवातीला राबवलेल्या मोहिमेत एक पाकिस्तानी बोट बुडवणाऱ्या ‘राजरतन’ या तटरक्षक जहाजाचे प्रमुख कमांडंट चंद्रशेखर जोशी यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानी बोटीवरील कर्मचाऱ्यांनी स्वत: बोट पेटवून दिल्याचा दावा सरकारने केला असताना, आपण ही बोट उडवून दिल्याचा आदेश दिल्याचे तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी सांगितल्यामुळे य मोहिमेबाबत वाद निर्माण झाला होता.
येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेतील नौदलाचे कमांडर मोहन मोकाशी व कॅप्टन राजेश धनकर यांनाही शौर्यपदके मिळणार आहेत. याशिवाय २ कीर्तिचक्र, ४९ सेना शौर्यपदक, २ नौसेना शौर्यपदक आणि ३ वायुसेना शौर्यपदकेही देण्यात येणार आहेत.
केंद्र व राज्य सुरक्षा दलांच्या मिळून एकूण ८२४ कर्मचाऱ्यांची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य व इतर पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. शौर्यासाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक २७ जुलैच्या गुरुदासपूरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग यांच्यासह पंजाबच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. सिंग यांचे सहकारी पोलीस निरीक्षक बलबीर सिंग व हवालदार तारासिंग यांच्यासह मेघालय पोलिसांचे जिल्हा पोलीस अधीक्षक टी.सी. चाको यांनाही या सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
एकूण शौर्यपदकांपैकी सर्वाधिक ६४ पोलीस पदके देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) मिळाली आहेत. उच्चपदस्थ माओवादी नेत्यांविरुद्ध शूर कारवाई केल्याबद्दल ‘शौर्यचक्र’ देण्यात आलेले सीआरपीएफचे दुसरे सर्वोच्च पदावरील अधिकारी एच.के. झा हे एकमेव निमलष्करी अधिकारी आहेत.

’अन्य मानकरी : पाकिस्तानी बोट बुडविणारे कमांडंट चंद्रशेखर जोशी, येमेनमधील भारतीयांची सुटका करणारे कमांडर मोहन मोकाशी व कॅप्टन राजेश धनकर, गुरुदासपूर कारवाईतील पोलीस अधीक्षक बलजितसिंग (मरणोत्तर),  पोलीस निरीक्षक बलबीर सिंग, हवालदार तारासिंग, मेघालय पोलिसांचे जिल्हा पोलीस अधीक्षक टी.सी. चाको