दोन वर्षांपूर्वी, २०१२ मध्ये दिल्लीनजीक लष्कराच्या दोन तुकडय़ांनी केलेल्या हालचालींवरून लष्कर व केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या वेळी लष्कराच्या तुकडय़ांनी केलेल्या हालचाली हा नेहमीच्या प्रशिक्षण व कसरतींचा भाग होता. परंतु लष्कराबाबत असलेल्या अविश्वासामुळे केंद्र सरकारला त्यात धोका वाटला, अशी स्पष्टोक्ती लष्करी कारवायांचे माजी महासंचालक (डीजीएमओ) ए. के. चौधरी यांनी केली.
२०१२ मध्ये १५ व १६ जानेवारीच्या दरम्यान रात्री चंदिगढ व हरयाणाकडून लष्कराच्या दोन तुकडय़ांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले होते. लष्कर बंड करणार असून दिल्ली ताब्यात घेणार असल्याच्या अफवेमुळे सरकारच्या सर्वोच्च पातळीवर घबराट उडाली होती. त्या रात्री घडलेल्या सर्व नाटय़ाचा खुलासा चौधरी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मांडला आहे.
केंद्र सरकारने मात्र हा सर्व प्रकार फेटाळून लावला आहे. लष्कर देशाचे रक्षण करते, अशा वेळी त्यांच्याविषयी सर्वोच्च मानाचे स्थान आमच्या मनात आहे. २०१२मध्ये ज्या काही घटना घडल्या त्या केवळ गैरसमजातून झाल्या. मात्र, त्यानंतर लष्कराचा खुलासा आल्याने सर्वाचेच शंकानिरसन झाले, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केले.
त्या रात्री शर्मा यांनी मला पाचारण केले. सर्व बाबींचा खुलासा मागत दोन्ही तुकडय़ांना पुन्हा तातडीने आपल्या छावण्यांमध्ये परतण्याच्या सूचना मला द्यायला लावल्या. हा सर्व गोंधळ कदाचित संरक्षण मंत्रालय व लष्करप्रमुख यांच्यात असलेल्या बेबनावामुळे झाला असावा अथवा केंद्र सरकारच्या मनात लष्कराविषयी असलेल्या अविश्वासामुळेच हा प्रकार घडला असावा. मात्र, बंड करण्याचा लष्कराचा मानस नव्हता. – ए. के. चौधरी, माजी डीजीएमओ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2014 10:36 am