अदिस अबाबा : नायजेरियास्थित अग्रगण्य सिमेंट कंपनीतील भारतीय व्यवस्थापकाची अन्य दोघांसह अज्ञात हल्लेखोरांनी इथिओपियामध्ये गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

डॅन्गोट सिमेंट ही नायजेरियातील डॅन्गोट इंटस्ट्रिज लि.ची कंपनी असून दीप कामरा हे तेथे व्यवस्थापक होते. कारखान्यातून अदिस अबाबा येथे परतत असताना ओरोमिया प्रांतात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे वृत्त पीएम न्यूज नायजेरियाने दिले आहे.

या हल्ल्यात कामरा यांचे स्वीय सचिव आणि वाहनचालक ठार झाले असून ते दोघेही इथिओपियाचे नागरिक आहेत. या घटनेचे वृत्त कळताच सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. डॅन्गोट प्रकल्प मे २०१५ मध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. सदर प्रकल्प सिमेंटचे सर्वाधिक उत्पादन करणारा इथिओपियातील प्रकल्प आहे.

ओरोमिया हा अदिस अबाबाच्या जवळचा प्रांत असून गेल्या दोन वर्षांपासून तेथे हिंसाचाराचा उद्रेक होत आहे. आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ा आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना तरुणवर्गात पसरली आहे त्यातून हिंसाचाराचा उद्रेक होत आहे.