जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आले. पुलावाममध्ये ठार झालेला दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अदनान असल्याची ओळख पटली आहे. या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणावर असलेला दारुगोळा आणि शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहेत. तर कुपवाडा येथे झालेल्या चकमकीतदेखील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. रविवारी या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण रेषेजवळच भारतीय जवानांनी हा प्रयत्न हणून पाडला आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत एक जवानही जखमी झाला.

कुपवाडातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून काही दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या जवानांच्या ही बाब लगेच लक्षात आली. दरम्यान, घुसखोर दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू करताच त्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या गोळीबारात दोन दहशतवादी जागीच मारले गेले. अन्य दहशतवादी मात्र पसार झाले.