लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेच्या काश्मीर खोऱ्यातील कारवायांचा प्रमुख कासिर अबू कासिम बुधवारी रात्री काश्मीरमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला. दक्षिण काश्मीरमधील खुडपोरा गावात काल रात्री सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान, रात्री २ वाजता भारतीय जवानांच्या गोळीबारात कासीम ठार झाल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, याठिकाणी अजूनही शोध मोहिम सुरू असून अबू कासिमचा मृत्यू सैन्यदलाच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे.
abu-qasim-em
अबू कासिम हा पाकिस्तानी नागरिक असून तो गेली सहा वर्षे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांची सूत्रे हाताळत होता. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अबू कासिमनेच सप्टेंबर महिन्यात उधमपूर येथे लष्करी बसवर झालेल्या हल्ल्याचा कट आखला होता. या हल्ल्यात दोन भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता, तर १६ जवान जखमी झाले होते. याशिवाय २०१३ मध्ये हैदरपोरा येथे लष्कारावर करण्यात आलेल्या हल्ल्यातही त्याचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वीच कासिमच्या मागावर असताना दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक अल्ताफ अहमद यांचा मृत्यू झाला होता.