News Flash

अमेरिका विरुद्ध चीन : करोना, तैवान, तिबेट अन् बऱ्याच मुद्द्यांवरुन उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत महासत्तांमध्ये जुंपली

जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जातेय

(फोटो सौजन्य: रॉयटर्स)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमधील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या दोन आर्थिक महासत्ताच्या बैठकीमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधी मत मांडल्याचे पहायला मिळालं. अलास्कामध्ये दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्राच्या सुरुवातीलच अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र संबंधांविषयक प्रमुख यांग जियेची यांनी आपआपल्या देशाची भूमिका मांडतानाच समोरच्या देशातील धोरणांवर टीका केल्याचं पहायला मिळालं.

एखाद्या गंभीर राजकीय विषयावर समोरासमोर बसून चर्चा करताना अशाप्रकारे दोन मोठ्या देशांनी अशाप्रकारे टोकाची भूमिका घेणं हे दुर्मिळ मानलं जातं. दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले त्यावरुन व्यक्तिगत स्तरावरील चर्चा ही अधिक नाट्यमय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांची परीक्षा घेणारी ही बैठक ठरणार असल्याची शक्यता या बैठकीपूर्वीच राजकीय जाणाकारांनी व्यक्त केली होती. या बैठकीच्या पहिल्याच दिवशी याची झलक पहायला मिळाली. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

दोन्ही देशांमध्ये तिबेट, हाँगकाँग आणि चीनच्या पश्चिमेकडील शिनझियांग श्रेत्रातील व्यापार तसेच मानवाधिकारांच्या उल्लंघनासंदर्भातील मुद्द्यावर मतभेद दिसून आले. तसेच तैवान, दक्षिण चीनचा समुद्र आणि त्यामध्ये चीनचा वाढता प्रभाव याचबरोबर करोनाचा संसर्ग आणि जगभरामध्ये झालेला प्रादुर्भाव या मुद्द्यांवरुनही दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच वादळी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बायडन प्रशासनाने ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध सुधरवण्याची तयारी दाखवली असली तरी चीनसंदर्भातील आक्षेपांची आणि ज्या मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत नाही अशा मुद्द्यांची यादीच या बैठकीमध्ये सादर केली.

ब्लिंकन यांनी बायडन प्रशासनाची चीनविरोधी भूमिका स्पष्ट शब्दांमध्ये मांडली. चीनच्या विस्तावरवादी प्रवृत्तीविरोधात अमेरिका इतर सहकारी देशांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे असं ब्लिंकन यांनी चिनी अधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर यांग यांनी अमेरिकेच्या भूमिकेसंदर्भात चीनला असणारे आक्षेप आणि इतर विषयांसंदर्भात चीनच्या भूमिकेपेक्षा अमेरिकीची भूमिका वेगळी कशी आहे याची यादीच वाचून दाखवली. अमेरिकेने मानवाधिकारांच्या मुद्द्यावरुन चीनवर आरोप केल्यासंदर्भातही यान यांनी आक्षेप नोंदवला. चीनने अमेरिकन लोकशाहीची सध्याची अवस्था, अल्पसंख्यांकाना दिली जाणारी वागणूक आणि जागतिक व्यापारासंदर्भातील विषयांवरुन अमेरिकेला सुनावलं. यांग यांनी जवळजवळ १५ मिनिटांचं भाषण दिलं. अमेरिकेकडून पैसा आणि लष्कराचा वापर करुन इतर लहान देशांवर दबाव निर्माण करण्याचा आरोप यांग यांनी आपल्या भाषणात केला.

या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणवपूर्ण असून या देशांमधील बैठकीचा पहिला टप्पा पाहता दोन्हीकडील विरोधामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होणारं पाऊल या देशांकडून उचललं जाण्याची भीतीही काही जाणकारांनी व्यक्त केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 3:33 pm

Web Title: top us chinese diplomats clash at start of first talks of biden presidency scsg 91
Next Stories
1 करोना लसीकरण : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं देशवासीयांना आवाहन!
2 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल व्यवहारांमध्ये ६७ टक्क्यांनी वाढ
3 “काँग्रेसने भ्रष्टाचाराचं बीज पेरलं अन् मोदी सरकारने विरोध करणाऱ्यांना दाबून टाकण्याच्या सर्व मर्यादा मोडल्या”
Just Now!
X