झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा काँग्रेसच्या आमदाराने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदारांचा घोडेबाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोलेबिरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कोंगारी यांनी आपल्यालाही सरकार पाडण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती, असा दावा इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद या तिन्ही पक्षांचं सरकार आहे.

सरकार पाडण्याविषयी देण्यात आलेल्या ऑफरबद्दल बोलताना काँग्रेसचे आमदार कोंगारी म्हणाले, “हे तिन्ही लोक माझ्यापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पोहोचले होते. काही कंपन्यांसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केले, पण ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने संपर्कात यायचे. एकदा तर त्यांनी मला रोख १ कोटींची ऑफर दिली. ही ऑफर आल्यानंतर मी लागलीच हे सगळं पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंह यांच्या कानावर घातलं. याबद्दल मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही माहिती दिली होती”, असं आमदार कोंगारी म्हणाले.

“आरपीएन सिंह यांना संपर्क केल्यानंतर ते म्हणाले की, याबद्दल माध्यमांशी काही बोलू शकत नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही यावर आतापर्यंत मौन बाळगलेलं आहे”, असं कोंगारी म्हणाले. “ते माझ्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी पैशांबरोबरच मंत्रिपदही देण्याचीही ऑफर दिली. पण त्यासाठी त्यांच्या अजेंड्याला पाठिंबा द्यावा, असं त्यांचं म्हणणं होतं. इतकंच नाही, तर हे सर्व आपण भाजपासाठी करत आहोत, असंही ते म्हणाले होते. आता अटक करण्यात आलेले तीन लोक तेच आहेत का, हे सांगता येणार नाही. कारण त्यांचे चेहरे आता लक्षात नाहीत, असंही कोंगारी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Topple hemant soren government offered rs 1 crore and ministry berth congress mla naman bixal kongari bmh
First published on: 26-07-2021 at 09:50 IST