करोनाग्रस्तांची देशातली संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात १ नवा रुग्ण आणि पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या १०१ झाली आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आढळत आहे ते केरळमध्ये केरळमध्ये ही संख्या ६० च्या वर पोहचली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्यं लॉकडाउन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान केंद्र सरकारने व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कठोर निर्बंध लावले आहेत. नियमांचं पालन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.

करोनाचा धोका टाळण्यासाठी देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन वारंवार करण्यात येतं आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. लोकांनी तो पाळला खरा. मात्र सोमवारी अनेकजण घराबाहेर पडले. खासगी वाहनाने प्रवास करु लागले. त्यामुळे अखेर सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.