देशात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये ४० हजार ७९१ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आतापर्यंत देशात एकूण ८२ लाख ९० हजार ३७१ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, मागील २४ तासांत देशात २९ हजार १६४ नवे करोनाबाधित आढळले असून, ४४९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८८ लाख ७४ हजार २९१ वर पोहचली आहे. देशात सद्यस्थितीस ४ लाख ५३ हजार ४०१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ लाख ३० हजार ५१९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

१६ नोव्हेंबरपर्यंत देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर १२,६५,४२,९०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ८ लाख ४४ हजार ३८२ नमुने काल तपासण्यात आले. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

देशात सध्या करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख कमी होत असला तरी धोका मात्र टळलेला नाही. आशतच करोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. भारतात भारत बायोटेक आयसीएमआरसोबत एकत्र येऊन करोनावरील लस विकसित करत आहे. काही दिवसांपूर्वी या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. भारत बायोटेकनं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, करोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या कंपनीने केला आहे. ही कंपनी तयार करत असलेली लस ९४ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे. एकाच आठवडय़ात लसीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे.