देशात मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली, तरी सणासुदीचा काळात नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडल्याने करोनाबाधितांच्या संख्येतही भर पडतच आहे. याचबरोबर करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणेही सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ४८ हजार ४९३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४५ हजार ५७९ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८९ लाख ५८ हजार ४८४ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ४ लाख ४३ हजार ३०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ८३ लाख ८३ हजार ६०३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, १ लाख ३१ हजार ५७८ रुग्ण आजपर्यंत करोनामुळे दगावले आहेत.

देशात १८ नोव्हेंबरपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर १२,८५,८,३८९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. तर, यातील १० लाख २८ हजार २०३ नमुने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेत फायझर कंपनीने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीच्या क्लिनिकल ट्रायल डाटाचे अंतिम विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार, ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा फायझरने केला आहे. ही लस सर्व वयोगटातील लोकांचे संरक्षण करते. आतापर्यंत ४४ हजार लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली, असे फायझर आणि त्यांची भागीदार कंपनी बायोनटेक एसईने म्हटले आहे. या रिझल्टमुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर लस उपलब्ध करुन देण्यासाठी, परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.