जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता तब्बल १५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागील २४ तासांत देशात ४८ हजार ५१२ नवे करोनाबाधित आढळले तर ७६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३१ हजार ६९९ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात करोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ४४७ आहे. तर, ९ लाख ८८ हजार ३० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे. देशात आतापर्यंत करोनामुळे ३४ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशभरात २८ जुलैपर्यंत १ कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. या पैकी ४ लाख ८ हजार ८५५ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरकडून ही माहिती मिळाली आहे.

जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची दिवसाची संख्या आता १ हजार ६०० वर पोहचली आहे. ही संख्या मागील अडीच महिन्यातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.