देशभरात करोना रुग्णांची संख्या ३७ हजार ७७६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १० हजार १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशभरात आत्तापर्यंत १२२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशभरात करोनाचं संकट संपलेलं नाही. रुग्णसंख्या रोज वाढते आहे. तसंच लॉकडाउनचा कालावधीही १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे. जे राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विशेष ट्रेनही सोडण्यात आल्या.

बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरून घरी आल्यावर हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा अशी आवाहनं करण्यात आली आहेत. तसंच जिथे करोनाचा रुग्ण सापडतो तो भाग तातडीने सील करण्यात येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण किंवा विलीगकरण करण्याचा सल्लाही दिला जातो आहे. सर्वतोपरी खबरदारी घेऊनही रुग्णसंख्या वाढते आहे. त्याचमुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.