जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 35 हजार 902 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 15 हजार 266 जण व एक स्थलांतरितासह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 783 जणांचा समावेश आहे.

करोना विषाणूने आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह देशात 548 आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा आकडा देण्यात आला आहे. यात प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई, स्वयंपाक कर्मचारी यांच्या माहितीचा समावेश नाही. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे डॉक्टर, परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी यांना करोना संसर्ग नेमका कुठून झाला हे समजलेले नाही.

राज्यातील 36पैकी 34जिल्हे करोनाबाधित असून, ही चिंताजनक बाब असल्याची टिप्पणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येऊ  शकेल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या 24 तासांत राज्यभरात 1,233 रुग्ण आढळल्याने राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 16,758वर पोहोचली. राज्यात बुधवारी करोनामुळे 34जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील 25 जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या 651 वर पोहोचली आहे.