गोमांस खायचे असल्यास ते भारतात येण्याआधी स्वदेशातूनच खाऊन या, असा सल्ला केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्ननथानम यांनी परदेशी पर्यटकांना दिला आहे. पर्यटकांनी भारतात फिरायला येण्याआधी स्वत:च्या देशातूनच गोमांस खाऊन यावे, असे अल्फॉन्स यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यावेळी अल्फॉन्स यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

अनेक राज्यांमध्ये गोमांसावर बंदी असून, त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसत असल्याबद्दल अल्फॉन्स यांना एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ‘ते (पर्यटक) त्यांच्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी भारतात येण्याआधी त्यांच्या देशातूनच गोमांस खाऊन यावे,’ असे उत्तर अल्फॉन्स यांनी दिले. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अल्फॉन्स भुवनेश्वरमध्ये होते.

याआधी काही दिवसांपूर्वीच केरळचे लोक गोमांस खाऊ शकतात, असे विधान पर्यटनमंत्री अल्फॉन्स यांनी केले होते. ‘ज्याप्रकारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या राज्यात गोमांसावर कोणतीही बंदी आणलेली नाही, त्याचप्रकारे केरळमध्येही गोमांस विक्री चालू राहिल,’ असे त्यांनी म्हटले होते. अल्फॉन्स यांनी याआधी आयएएस अधिकारी म्हणून काम केले आहे.

परदेशी पर्यटकांनी त्यांच्या देशातून गोमांस खाऊन भारतात यावे, या विधानानंतर पत्रकारांनी अल्फॉन्स यांना त्यांच्या केरळमधील विधानाबद्दल विचारले. यावर बोलताना, मी खाद्यमंत्री नाही, त्यामुळे हा निर्णय मी घेऊ शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. पर्यटन मंत्रालयाचा कारभार हाती घेताच, ‘देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नव्या संकल्पनांवर काम करणार,’ असल्याचे त्यांना सांगितले होते. ‘पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांनी नव्या कल्पना पुढे आणाव्यात. या कल्पनांवर महिन्याभरात काम सुरु करण्यात येईल,’ असेही त्यांनी म्हटले होते.