रशियातील उरल प्रांतात ज्या ठिकाणी उल्केचा स्फोट झाला तेथील सरोवरात आता अशनी म्हणजेच उल्कापाषाणांचा शोध घेतला जात आहे, अशनीपाताने तिथे १२०० जण जखमी झाले आहेत व पाचशे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दहा टनाची उल्का उरल भागातील अवकाशात पेटत जाताना तिचा स्फोट झाला होता. अनपेक्षितपणे झालेल्या उल्कावर्षांवामुळे  चेलबिन्स्क येथे वाहतूक विस्कळीत झाली. आकाशातील प्रकाशनाटय़ पाहण्यासाठी लोक रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तेथे गाडय़ा व घरांच्या काचा फुटून अनेक लोक जखमी झाले होते.
रशियाचे आपत्कालीन व्यवस्था मंत्री व्लादिमीर पुशकोव यांनी सांगितले की, आमचे एक खास पथक तिथे काम करीत आहे. तेथील इमारतींची सुरक्षाही तपासली जाणार आहे. अशनीपातामुळे तिथे गॅसवाहिन्या तुटल्या असून गॅसपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जात आहे. उल्केचे जे तुकडे जमिनीवर कोसळतात त्यांना अशनी किंवा उल्कापाषाण असे म्हणतात. असे उल्कापाषाण चेलबिनस्क प्रदेशातील चेबारकुल या गोठलेल्या सरोवरात पडले किंवा कसे याचा शोध घेतला जात आहे. सहा पाणबुडे तेथील पाण्यात जाऊन उल्कापाषाण म्हणजे अशनींचा शोध घेत आहेत, असे रशियाच्या आपत्कालीन मदत विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
पुशकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात अशनी म्हणजे उल्कापाषाण सापडले नाहीत. नासाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या उल्केच्या स्फोटातून निर्माण झालेली ऊर्जा दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा येथे टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा ३० पटींनी अधिक होती. नासाचे पृथ्वी निकट पदार्थ कार्यक्रमाचे प्रमुख पॉल शोडास यांनी सांगितले की, साधारण शंभर वर्षांतून एकदा अशी घटना होते.