25 September 2020

News Flash

ट्रॅक्टर विक्रीत १० टक्क्यांनी वाढ

अडचणीतील वाहन उद्योगाला ग्रामीण भागाचा हात

संग्रहित छायाचित्र

अमर सदाशिव शैला

टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले असताना वाहन उद्योगाला ग्रामीण भागाने काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीत १०.८६ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. टाळेबंदीचा इतर उद्योग-व्यवसायांना फटका बसला असला तरी कृषी क्षेत्र विस्तारल्याचे त्यातून सूचित होत आहे.

देशात जूनमध्ये ९ लाख ८४ हजार वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी १६ लाख ९७ हजार वाहनांची विक्री झाली होती. राज्यातील अनेक भागांतील कडक टाळेबंदीचा फटका येथील वाहन उद्योगाला बसला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमधील विक्रीत ६३ टक्क्यांनी घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. याला फक्त ट्रॅक्टरचा अपवाद आहे. जून महिन्यात देशभरात ४० हजार ९१३ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा १०.८६ टक्क्यांची वाढ नोंदवून ही विक्री ४५ हजार ३५८ पर्यंत गेली आहे.

दुचाकी, ट्रॅक्टर आणि छोटी व्यावसायिक वाहने यांच्या ग्रामीण भागातील मागणीने या क्षेत्राला काहीसा दिलासा दिला. मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरातील जनजीवन अद्यापही पूर्वपदावर आले नसल्याने या भागात विक्री अद्यापही रोडावलेली आहे. दुचाकी विक्रीत ४० टक्क्यांची घट झाली असून ती गेल्या वर्षीच्या १३ लाख ३७ हजारांवरून ७ लाख ९० हजारांवर आली आहे. प्रवासी वाहनांची विक्री अद्यापही ३८ टक्क्यांनी घटलेली आहे. जूनमध्ये १ लाख २६ हजार प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात २ लाख ५ हजार प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. तीन चाकी वाहन विक्रीत ७५ टक्के आणि व्यावसायिक वाहन विक्रीत ८४ टक्के घट नोंदविली गेली आहे. राज्यातही ट्रॅक्टरच्या विक्रीत ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४ हजार ५१९ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यात वाढ होऊन यावर्षी राज्यात ४ हजार ७४९ टॅक्टरची विक्री झाली आहे.

मागणी पूर्वपदावर येण्यास विलंब

ग्रामीण भागात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाहनांची मागणी पूर्वपदावर आली आहे. शहरी भागातील मागणी अद्यापही ४० ते ५० टक्क्यांवरच आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अद्यापही टाळेबंदीतच आहेत. त्याचा परिणाम येथील वाहन विक्रीवर झाल्याचे दिसत आहे. शेतीतील सकारात्मक वातावरणामुळे ग्रामीण भागातील मागणी लवकरच पूर्वपदावर येईल. मात्र, उद्योग सुरू होऊन अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास आणखी काही कालावधी लागेल. त्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील मागणी पूर्वपदावर येण्यास काही काळ जाईल, असे मत फेडरेशन ऑफ ऑटोमोबइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशीष काळे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:15 am

Web Title: tractor sales up 10 per cent abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
2 दिल्लीत २४ टक्के लोकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव
3 ऑक्सफर्ड लशीच्या निष्कर्षांचे भारतात तज्ज्ञांकडून स्वागत
Just Now!
X