News Flash

कृषी विधेयकावरुन हिंसक आंदोलन: इंडिया गेटवर पेटवला ट्रॅक्टर

इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला.

(फोटो सौजन्य : Twitter/BagwanMaheboob)

कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात आंदोलन सुरु आहे.

सकाळी सात वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

“इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून तपास सुरु आहे” असे नवी दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले.

आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.

कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने शनिवारी रात्री उशिरा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता. “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे” अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 10:13 am

Web Title: tractor set on fire at india gate in delhi during protest against farm bills dmp 82
Next Stories
1 वाँटेड गुन्हेगाराला मुंबईहून उत्तर प्रदेशला नेताना कार पलटी झाली, गँगस्टरचा जागीच मृत्यू
2 NDA फक्त नावाला, इतक्या वर्षात पंतप्रधानांनी बैठकही बोलावली नाही – सुखबीर सिंग बादल
3 आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष : एकमेकांचे रणगाडे, हेलिकॉप्टर्स उद्धवस्त केले; १६ जणांचा मृत्यू
Just Now!
X