आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले असले तरी दिल्लीसह देशभरातील बाजारपेठा खुल्या राहतील, तसेच वाहतूक सेवाही सुरू राहतील, असे व्यापाऱ्यांच्या ‘कॅट’ या संघटनेने, तसेच वाहतूकदारांच्या संघटनेने सोमवारी सांगितले.
मंगळवारी आयोजित केलेल्या ‘भारत बंद’मध्ये व्यापारी आणि वाहतूकदार सहभागी होणार नाहीत, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन (एआयटीडब्ल्यूए) या संघटनांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. ‘८ डिसेंबरला देशभरातील व्यावसायिक बाजारपेठा सुरू राहतील आणि व्यापारविषयक उलाढालीही नेहमीप्रमाणे होतील, तसेच वाहतूक सेवाही सुरू असतील’, असे या निवेदनात म्हटले आहे. ‘भारत बंद’ला पाठिंबा मिळवण्यासाठी कुठल्याही शेतकरी संघटनेने संपर्क साधला नसल्याचे ‘कॅट’चे अध्यक्ष बी.सी. भरतिया व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि एआयटीडब्ल्यूएचे अध्यक्ष प्रदीप सिंघल व सरचिटणीस महेंद्र आर्य यांनी सांगितले.
केंद्राची सूचना
‘भारत बंद’दरम्यान सुरक्षाव्यवस्था कडक ठेवावी अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. अंतरनियम यांच्या संदर्भातील करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे बंदच्या काळात पालन केले जाईल हे प्रदेशांच्या प्रशासनांनी सुनिश्चित करावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या देशव्यापी सूचनावलीत म्हटले आहे.
अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
लखनौ: येथील मध्यवर्ती ठिकाणी अडथळे ओलांडून धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले. बंदला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अखिलेश यांना ताब्यात घेऊन पोलिस वाहनातून नेले. जर कृषी कायदे
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत तर मग सरकार संघर्षांच्या मार्गाने का जात आहे, शेतक ऱ्यांना नवीन कायदे नको असतील तर ते मागे घ्यावेत असे यादव यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:01 am