व्यापार युद्धाची व्याप्ती वाढली

अमेरिकेने आयात कर वाढवल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठी कॅनडानेही अमेरिकी वस्तूंवर आयात कर लादला आहे. उन्हाळयात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर कॅनडाने कर वाढवला असून त्या वस्तूंमध्ये फ्लोरिडाचा संत्रा रस, केचअप, केंटुकी बोर्बन यांचा समावेश आहे. एकीकडे  तापमान वाढत असताना अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशातील वातावरणही तापले आहे. कॅनडाच्या १२.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेने आयात कर वाढवला होता. त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होत असतानाच कॅनडाने हा निर्णय घेतला आहे. कॅनडात उद्या राष्ट्रीय दिनाची सुटी असून त्यानंतर अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशात सध्या जशास तसे वागणे सुरू असून अमेरिकेने जूनमध्ये पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादला होता. कॅनडाने आता त्यांच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियम क्षेत्राला दीड अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्यात या क्षेत्रातील ३३५०० कामगारांचे हितही लक्षात घेतले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी शुक्रवारी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना दूरध्वनी करून सांगितले की, आम्ही अमेरिकेने १ जून रोजी पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर लादलेल्या कराला तोंड देण्यासाठी काही उपाययोजना करीत आहोत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री ख्रिस्तिया फ्रीलँड यांनी ओंटारिओतील हॅमिल्टन येथे अमेरिकी पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादण्याची घोषणा केली.  त्या म्हणाल्या, की आम्ही संतापातून ही कृती करीत नाही पण आमची ती अपरिहार्यता आहे. अमेरिकेच्या अडीचशे वस्तूंवर कॅनडाने कर वाढवला असून त्यात फ्लोरिडा ज्यूस, विस्कॉन्सिन टॉयलेट पेपर, नॉर्थ कॅरोलिना घेरकिन्स यांचा समावेश आहे. अमेरिकेने पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर अनुक्रमे २५ व १० टक्के कर लावला होता, तेवढय़ाच प्रमाणात कर अमेरिकेच्या या वस्तूंवर लावण्यात आला आहे. अमेरिकेने धातूंवरील करातून आधी कॅनडा व मेक्सिकोला वगळले होते.

जागतिक व्यापार संघटनेतून माघार नाही- डोनाल्ड ट्रम्प

जागतिक व्यापार संघटनेतून माघार घेत असल्याच्या वृत्ताचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इन्कार केला असला तरी जागतिक व्यापार संघटना अमेरिकेला अतिशय वाईट वागवत असल्याची टीका केली आहे.

ट्रम्प हे जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडत असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आली होती. ट्रम्प यांनी वार्ताहरांना सांगितले की, जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा विचार नाही. पण या संघटनेने अमेरिकेला वाईट वागवले आहे. अतिशय अन्यायकारक अशी स्थिती आहे. जागतिक व्यापार संघटनेत चीनचा उदय व्यापारी शक्ती म्हणून झाला.

जागतिक व्यापार संघटनेतील अनेक खटल्यात अमेरिकेच्या विरोधात निकाल गेले आहेत. आमचे फारसे न्यायाधीश तेथे नाहीत. त्या संघटनेने अमेरिकेला न्यायाने वागवावे. ट्रम्प हे जागतिक व्यापार संघटनेचे टीकाकार असून त्यांनी वेळोवेळी ही संघटना पक्षपाती असल्याची टीका केली आहे.  अमेरिकेच्या पूर्वीच्या अध्यक्षांनी योग्य प्रकारे वाटाघाटी केल्या नाहीत म्हणून इतर देशांचा फायदा झाला. तुम्ही युरोपीय समुदायाकडे पाहा, त्यांची व्यापार तूट १५० अब्ज डॉलर्स आहे. चीनची ३७५ अब्ज तर मेक्सिकोची १०० अब् ज डॉलर्स आहे. तुम्ही कॅनडाकडे पाहा, त्यांनी आम्हाला वाईट वागवले, असे ट्रम्प म्हणाले.