अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर आयात कर लादूनही चीन व अमेरिका व्यापारात समतोल ढासळला असून चीनचा व्यापार यात जास्त आहे. ऑगस्टमध्ये चीनचा व्यापार ३१ अब्ज डॉलर्स झाला आहे. अमेरिकेने कर लादूनही चीनच्या वस्तू अमेरिकेत विकल्या जात आहेत असा त्याचा अर्थ आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयात वस्तूंवर सरसकट कर लादण्याचे जाहीर केले आहे. एकूण १ लाख कोटींच्या वस्तूंवर हा कर लागू केला जाणार आहे.
अमेरिका व चीन या जगातील दोन मोठय़ा अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी एकमेकांशी व्यापार युद्ध छेडले आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला जुलैत चीनच्या ३४ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर २५ टक्के कर लादला होता तर नंतर ऑगस्टमध्ये १६ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर कर लादला होता. जशास तसे या नात्याने दोन्ही देशांनी एकमेकांवर कर लादला होता. पण हा कर लादूनही अमेरिकेत चिनी वस्तूंची मागणी व त्यांच्या खपावर परिणाम झालेला नाही. चीनची निर्यात ऑगस्टमध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत १३.२ टक्क्य़ांनी वाढली असून ती ४४.४ दशलक्ष डॉलर्स झाली आहे. सीमा शुल्क खात्याच्या माहितीनुसार १३.३ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या वस्तू म्हणजे गतवर्षीपेक्षा दोन टक्के अधिक किमतीच्या वस्तू अमेरिकेत गेल्या. चीनची व्यापारातील बाजू चढती असून अमेरिकेच्या वस्तू ऑगस्टमध्ये ३१ अब्ज डॉलर्सचा टप्पा चीनमध्ये गाठू शकल्या आहेत. गेल्या वर्षी पेक्षा अमेरिकेची निर्यात १८.७ टक्के वाढली आहे. यंदाच्या जूनमध्ये अमेरिकेची निर्यात विक्रमी म्हणजे २९.९ दशलक्ष डॉलर्स होती. चीनचे अमेरिकेबरोबरच्या व्यापारातील अधिक्य हे वाढले असून ते इतर जगाच्या तुलनेत ऑगस्टमध्ये २७.९ अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिले आहे. गतवर्षीच्या याच काळाचा विचार करता जागतिक निर्यात वाढ ९.८ टक्के असून आयात २० टक्के वाढली आहे. जुलैत जागतिक निर्यात १२.३ टक्के वाढली असून आयात २७ टक्के वाढली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2018 1:15 am