वाहतुकीचे उल्लंघन करणे हा आपल्या भारताच्या समाजजीवनाचा स्थायीभाव..संधी मिळेल तेथे आपले वाहन; मग ती सायकल असो वा दुचाकी अथवा चारचाकी वाहन..प्रत्येकाला आपले वाहन पुढे नेण्याची कायम घाई आणि त्या घाईचा परिणाम म्हणजे वाहतुकीचे नियम बेधडकपणे मोडून पुढे जाणे ही बाब आपण नेहमी बघतो. पोलिसांनी पकडल्यानंतर ‘तोडपाणी’ करणे किंवा त्याच्याशी हुज्जत घालून आपण कसे चूक नाही, हेही पटविण्याचा प्रयत्न करणे नित्याचे आहे.
राजकोटच्या महिला पोलिसांनी मात्र रविवारी राखी पौर्णिमेचे औचित्य साधत अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या चालकांना कोणतीही शिक्षा न करता, दंडाची पावती न फाडता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा चालकांना चक्क राखी बांधून त्यांना वाहतुकीचे नियम ‘वेगळ्याच प्रकारे’ ‘समजावून’ सांगितले.
नियम मोडणाऱ्या चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत महिला पोलीस तैनात करण्यात आल्या होत्या. रविवारी या मोहिमेअंतर्गत सुमारे दोन हजार राख्यांचे अशा प्रकारे ‘वाटप’ करण्यात आले आणि वाहतुकीचे नियम समजावून देणारी तेवढीच माहिती पत्रकेही अशा चालकांना देण्यात आली. लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल सजगता उत्पन्न व्हावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए.एल.चौधरी यांनी दिली. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचा तरी वाहने चालविणाऱ्यांवर सकारात्मक परिणाम होईल, असा आशावाद चौधरी यांनी व्यक्त केला.