दिल्लीतील केजरीवाल सरकारने राबवलेल्या सम-विषम वाहनांच्या योजनेच्या समाप्तीनंतर आजपासून तेथील वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा जैसे थे झाला आहे. या योजनेचा मूळ हेतू हवाप्रदूषण कमी करणे हा होता, तरी त्यामुळे वाहतूककोंडीची समस्याही कमी झाली होती. आज सकाळी नऊ वाजल्यापासून दिल्ली कॅन्टोन्मेंट भागात मोठी वाहतूककोंडी झाली. पंखा रोड व उत्तमनगर तसेच पुसा रोड ते शादीपूर पट्टय़ात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी अकरा वाजल्यापासून दिल्ली कॅन्टोन्मेंट भागात वाहतूककोंडी सुरू झाली व धौला कुआँ भागापर्यंत तेथे अनेक वाहने अडकून पडली. दरम्यान, पूर्व दिल्लीत खिचडीपूर, बुरारी बायपास व शाहदरा बायपास येथे वाहतूककोंडी झाली.
पूर्व दिल्लीत प्रीत विहार व विकास मार्ग भागात वाहतूक धिम्या गतीने चालू होती. त्याचे परिणाम राजौरी व पटेलनगर भागातही जाणवले. दिल्लीत प्रदूषणाबरोबरच वाहतूककोंडीची समस्या उग्र होत आहे. त्यामुळे आता सरकार सायकल डे चा पर्यायही वापरण्याचा प्रयत्न करणार आहे.