25 September 2020

News Flash

दिल्लीकरांनी वेग पकडला!

दोन महिन्यांच्या विरामानंतर शहरात गजबज

दोन महिन्यांच्या विरामानंतर शहरात गजबज; खासगी गाडय़ांमुळे वाहतूक कोंडी

नवी दिल्ली : टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यामुळे दोन महिन्यांनंतर राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर पुन्हा वाहतूक कोंडी दिसू लागली आहे. मंगळवार-बुधवारपासून दिल्लीकर घराबाहेर पडू लागल्याने एकाच वेळी खासगी वाहने, बस, रिक्षा यांची गर्दी पाहायला मिळाली. सरकारी कार्यालये तसेच खासगी कंपन्यांमध्येही १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आल्याने ‘बाबू लोकां’चे शहर ही दिल्लीची ओळख परत मिळाली आहे.

उच्चमध्यमवर्गीय बुद्धिवाद्यांचा अड्डा मानले गेलेले खान मार्केट खुले झाले असले तरी तेथे तुलनेत शांतता दिसत होती. रेस्तराँ सुरू होत नाहीत, शिवाय संध्याकाळी सात ते सकाळी सात लोकांच्या सार्वजनिक वावराला बंदी असल्याने खान मार्केटमधील रात्रीचा झगमगाट परतायला वेळ लागणार आहे. नवी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात ‘कनॉट प्लेस’मध्येही शुकशुकाट होता. दुकाने उघडण्यासाठी सम-विषम सूत्र लागू करण्यात आले आहे. ग्राहकांची संख्या अगदीच कमी असल्यामुळे या सूत्राचा पुनर्विचार केला जाण्याची शक्यता आहे. जुन्या दिल्लीतील नेहमी गजबजलेल्या चाँदनी चौकात बुधवारी काही प्रमाणावर रेलचेल होती. जनपथवरही दुकानदार ग्राहकांची वाट पाहात बसून होते.

दिल्लीतील वाहनांची गर्दी मात्र ओसंडून वाहत होती. बस गाडय़ांमध्ये फक्त २० प्रवाशांनाच प्रवेश असल्याने प्रत्येक बसथांब्यावर चाकरमान्यांची बसमध्ये घुसण्याची ओढ लागलेली होती. त्यामुळे अंतरसोवळ्याचे भान लोक विसरून गेले. मंगळवारी फक्त साडेतीन हजार बस गाडय़ाच रस्त्यावर उतरवल्या गेल्या. बुधवारी त्यात भर पडली असली तरी पूर्ण संख्येने बस सेवा सुरू होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. बस गाडय़ांचे अनेक चालक गुरुग्राम आणि गाझियाबाद भागांतून येत असल्याने त्यांना सीमापार करण्यात अडचण आहे. त्यांना प्रवेशिकेविना दिल्लीत येता येणार नाही. नोएडा आणि गाझियाबाद सीमांवर प्रवेशिका असल्याशिवाय ये-जा करण्यास स्थानिक प्रशासनाने बंदी घातल्यामुळे या दोन्ही सीमांवर वाहनांची तुडुंब गर्दी होती. दिल्लीकरांना मेट्रोची सवय असल्याने त्यांच्या नेहमीच्या ‘सवारी’शिवाय प्रवास करणे त्यांना अवघड जात आहे.

ई-रिक्षाचालकांसमोर पेच

दिल्लीत ई-रिक्षा, सायकल-रिक्षा आणि ऑटो रिक्षा एकाच वेळी बंधुभावाने प्रवाशांची सेवा करतात. पण टाळेबंदीच्या नियमामुळे फक्त एक प्रवासी घेऊन जाता येते. हा नियम रिक्षावाल्यांना आर्थिकदृष्टय़ा न परवडणारा असल्याने अनेक ठिकाणी नियमभंग करून रिक्षा सेवा सुरू आहे. रहिवासी क्षेत्रांत ये-जा करण्यासाठी ई-रिक्षा सोयीची असते. प्रत्येक प्रवाशामागे दहा रुपये घेतले जातात. त्यामुळे एका फेरीत चाळीस-पन्नास रुपये मिळतात. पण आता फक्त दहा रुपयेच मिळतील. भाडे दुप्पट केले तरी तोटा होणारच, अशी ई-रिक्षावाल्यांची तक्रार आहे. ऑटो रिक्षावालेदेखील एकाच वेळी चार-पाच प्रवाशांना घेऊन जाताना दिसत होते.

पुन्हा प्रदूषणात वाढ..

कोंडलेली दिल्ली टाळेबंदीमुळे मोकळा श्वास घेत होती. आता पुन्हा प्रदूषणात वाढ होऊ  लागली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हवेत धुळीची वादळे येतात. त्यामुळे दिल्लीकर रस्त्यावर आले नसतानाही दिल्लीच्या प्रदूषणात वाढ होऊ  लागलेली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक दोनशेहून अधिक झालेला आहे. दिल्लीत तापमानाचा पारादेखील चाळीसपार गेलेला आहे. कडक ऊन, धूळ आणि वाहनांचे प्रदूषण यामुळे दिल्लीत नेहमीची धूसरता अवतरू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 5:00 am

Web Title: traffic resumes in delhi after two months lockdown relaxes zws 70
Next Stories
1 रेल्वे स्थानकांवर आरक्षित तिकीट उपलब्ध
2 हर्षवर्धन आज ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार
3 Coronavirus Outbreak : देशातील रुग्णवाढ कायम!
Just Now!
X