करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत लोकांना आपल्या घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. या कालावधीत मोबाईलचं रिचार्ज संपलं तर लोकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकर ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना आपल्या प्रीप्रेड ग्राहकांच्या क्रमांकांची वैधता वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. २१ दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान ग्राहकांना अखंड सेवा मिळावी, असं ट्रायनं म्हटलं आहे.

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनच्या कालावधीत ग्राहकांना विना अडथळा सेवा मिळावी यासाठी ग्राहकांच्या प्रीपेड सेवांची वैधता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच दूरसंचार नियामक प्राधिकरणानं यासंदर्भात त्वरित यावर माहिती मागवली आहे. ग्राहकांच्या क्रमांकांची वैधता वाढवावी यासाठी ट्रायनं कंपन्यांना आवश्यक ती पावलं उचलण्यासदेखील सांगितलं आहे.

लॉकडाउनमुळे विक्री केंद्रांवर परिणाम
दूरसंचार सेवांना अत्यावश्यक सेवांमध्ये ठेवण्यात आलं आहे. तरी या लॉकडाउनमुळे ग्राहक सेवा केंद्र आणि विक्री केंद्रांवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच ग्राहकांना टॉपअप किंवा क्रमांकांची वैधता वाढवण्याची आवश्यकता भासू शकते. यामध्ये ऑफलाइन सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच त्यांची सेवाही खंडीत होऊ शकते, त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकांच्या क्रमांकाची वैधता वाढवण्यावर विचार करावा, असं ट्रायनं म्हटलं आहे.